
वाळूज महानगर, (ता.8) – लिंबेजळगाव येथील राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी रितेश राजेंद्र केरे याने 17 व्या दिव्यांग राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत तीन सुवर्णपदके पटकावत राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेत गोल्डन हॅट्रिक केली.
सिद्धार्थ जलतरण तलाव छत्रपती संभाजीनगर येथे 4 व 5 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 125 पेक्षा अधिक दिव्यांग जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सिनिअर वयोगटात रितेश केरे याने 100 मीटर बॅकस्ट्रोक 1.30.94, 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक 1.32.41, 200 मीटर आयएम (वैयक्तिक मेडली) 3.21.28 या तीन सुवर्णपदकांसह रितेशने गोल्डन हॅट्रिक पूर्ण केली. विशेष म्हणजे, रितेश हा महाराष्ट्रातील पहिला अंध जलतरणपटू असून त्याची निवड स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI), गांधीनगर, गुजरात येथे स्विमिंग प्रशिक्षणासाठी झाली आहे. तो गेल्या चार महिन्यांपासून तिथे सराव करत असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज होत आहे. आंतरराष्ट्रीय कोच व मार्गदर्शक अभय देशमुख, तसेच कोच किरण शुरकांबळे आणि कोच सूर्यकांत यांच्या मार्गदर्शनाखाली रितेशने आजवर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्विमिंगमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. रितेशने आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स, रनींग, राष्ट्रीय स्विमिंग व ट्रायथलॉन आणि मॅरेथॉन स्पर्धांमध्येही अनेक पदके जिंकली आहेत. या अद्वितीय यशाने रितेशने केवळ स्वतःचेच नव्हे, तर राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश आलोने, सचिव डॉ. चंद्रशेखर आलोने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन नलावडे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
