
वाळुज महानगर, (ता.20) – मुरमी येथील 17 वर्षीय वैष्णवी संतोष निळ या बारावीतील विद्यार्थिनीचा विळीसारख्या धारदार हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला वाळूज पोलिसांनी अवघ्या चारच तासात जेरबंद केले. त्याला शनिवारी 20 डिसेंबर रोजी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुरमी येथे आई मथुराबाई, वडील संतोष, भाऊ प्रितेश व आजोबा यादवराव यांच्यासह राहणारी 17 वर्षीय वैष्णवी संतोष निळ ही वाळूज येथील श्री साईनाथ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी दुपारी वैष्णवी ही कॉलेजमधून आली. त्यावेळी तिची आई शेतात, भाऊ शाळेत, वडील संतोष निळ हे ईसारवाडी रोड वरील टपरीवर होते. तर 70 वर्षी आजोबा घरापासून काही अंतरावर बसलेले होते. त्यामुळे वैष्णवी घरात एकटीच होती. यावेळी आरोपी नानासाहेब कडुबा मोरे (वय 27) हा वैष्णवीच्या घरात आला. आणि विळी सारख्या धारदार हत्याराने वैष्णवीचा गळा चिरला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच मुरमी गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ.भागीरथी पवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास कामी सूचना केल्या.

पोलिसांनी शोधला प्रथम पुरावा –
वैष्णवीचा खून केल्यानंतर आरोपी नानासाहेब मोरे हा गावकरी वपोलिसांच्या भीतीने फरार झाला. मात्र फरार होण्यापूर्वी त्याने कोणताही पुरावा घटनास्थळी सोडला नाही. त्यामुळे पोलिसांना विविध पैलू खंगाळावे लागले. अखेर गावकऱ्याकडून क्ल्यू मिळाला. आणि आरोपीच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले.
लोकेशन मिळाल्याने घातली झडप –
पोलीस आरोपी नानासाहेब मोरेच्या शोधात रवाना झाले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना आरोपीच्या मोबाईल टावरचे लोकेशन मिळाले. हे लोकेशन मिळताच बाबरगाव येथे लपून बसलेल्या आरोपी मोरे याला वाळूज पोलिसांनी झडप घालून जेरबंद केले.
आरोपी घरा जवळचाच –
या प्रकरणातील मयत वैष्णवी राहत असलेल्या मुरमी येथील तिच्या घराजवळच आरोपी नानासाहेब कडूबा मोरे हा राहतो. शेजारी राहत असल्याने पूर्वीपासूनच ओळख असलेल्या वैष्णवीशी त्याचा वाद झाला. आणि या रागाच्या भरात त्याने विळी सारख्या धारदार हत्याराने वैष्णवीच्या गळ्यावर वार करून तिचा निर्घृण खून केला. अशी कबुली त्याने दिल्याचे पोलीस सांगतात.
सात दिवसाची पोलीस कोठडी –
दरम्यान वाळूज पोलिसांनी आरोपी नानासाहेब मोरे याला शनिवारी 20 डिसेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी ही पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे पो.नि.गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, प्रविण वाघ, पोह संदिप धनेधर, पोलीस अंमलदार पांडुरंग शेळके, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे, शेख गफ्फार, अमोल गायकवाड, नितीन देशमुख, धनंजय सानप, पोलीस मित्र किशोर गाडेकर, अमन शेख यांनी केली.
