वाळूजमहानगर, ता.16 – राहत्या घरातील भूमिगत असलेल्या हौदामध्ये अवैध रित्या साठवुण ठेवलेला विविध कंपनीचा पाउण लाख रुपये किमतीचा गुटखा व सुगंधीत पान मसाला एमआयडीसी वाळूज पोलीसांनी छापा मारुन जप्त केला. ही कारवाई वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शनिवारी (ता.16) रोजी पहाटे करण्यात आली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेपु) येथील गणेशनगरातील एका घरात अवैध रित्या, विनापरवाना गुुटखा, सुगंधीत पान मसाला साठवुण ठेवलेला असल्याची माहिती मिळाल्याने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मनोज शिंदे, पोह विनोद नितनवरे, यशवंत गोबडे, गणेश सगरे, समाधन पाटील यांनी शनिवारी (ता.16) रोजी पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास छापा मारला. तेथे मुंटूनकुमार रामेश्वर भगत याच्या ताब्यात 28 हजार 800 रुपये किमतीचा गोवा गुटखा, 37 हजार 200 रुपये किमतीचा राजनिवास सुंगधीत पान मसाला, 9 हजार 600 रुपये किमतीचा जाफरांनी जर्दा व 500 रुपये किमतीचा एक मोबाईल असा 76 हजार 148 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मुंटूनकुमार रामेश्वर भगत याच्या विरूध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
तळघरात केला भूमिगत हौद –
रांजणगाव (शेणपुंजी) येथील क्लिपटन वाईन शॉपच्या पाठीमागील गणेशनगरात राहणारा
मुंटूनकुमार रामेश्वर भगत (वय 31) हा गुटखा किंग असल्याचे समजते. त्याने अवैध मार्गाने चोरटी विक्री करण्यासाठी आनलेला विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित पान मसाला साठवणूक करण्यासाठी घराच्या तळघरात खास भूमिगत हौद केला होता. याच हौदात मुन्टूनकुमार भगत हा अवैधरित्या गुटखा साठवून ठेवत होता.
अखेर पोलिसांनी शोधलाच मुद्देमाल –
मुन्टूनकुमार भगत याने घराच्या तळघरात गुळगुळीत फरशी बसवलेली आहे. याच फरशीमध्ये दोन बाय दोन आकाराचे झाकण करून तळघरात भूमिगत हौद केला आहे. अवैध मार्गाने व चोरटी विक्री करण्यासाठी आणलेला विविध कंपनीचा गुटखा व सुगंधित पान मसाला याच हौदात साठवल्या जात होता. त्यामुळे तो शोधूनही सापडत नव्हता. मात्र पोलिसांना मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी घराची निक्षून पाहणी केली. अखेर तळघरातील भूमिगत हौद दिसला आणि पोलिसांनी मुद्देमात जप्त केला.