
वाळूजमहानगर, ता.6 (बातमीदार) – रांजणगाव (पोळ) येथील नॅशनल इंग्लिश स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कुऱ्हाडे सर तर प्रमुख पाहुणे वैशाली वाघचौरे होत्या.
प्रथम सर्व स्टाफच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. वाघचौरे मॅडम यांनी सावित्रीबाई साकारल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, सावित्रीबाईंनी स्वतःची आत्मकथा सांगताना किती कठीण परिस्थितीत सावित्री शिकल्या, मुलींना शिकवले आणि बालविवाह, सतीप्रथा, केशवपन या विरोधात समाजकार्य केले. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, गीत सादर केले. अनेक विद्यार्थिनींनी प्रतिकात्मक सावित्रीबाई साकारल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवकर मॅडम यांनी केले. मुलींनी सावित्रीबाई बनण्याचा नक्की प्रयत्न करावा. असे प्रदिप पठारे यांनी नमूद केले व सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्टाफ, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
