वाळूजमहानगर (ता.22) – प्रशासनाचे दुर्लक्ष व आमदार खासदारांसह राजकीय पुढारी एकमेकांची कुरघोडी करण्यात व्यस्त असल्याने वेचणीला आलेला कापूस व तोडणीला आलेला ऊस ही नगदी पिके रस्त्या अभावी हातची जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बगडी ता. गंगापूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी गोदावरी नदी पात्रातील फुगवट्याच्या पाण्यात मंगळवारी (ता.22 रोजी) जलसमाधी आंदोलन करून स्थानिक पुढारी व प्रशासनाचे लक्ष वेधले.
बगडी ता. गंगापूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या
जमिनी या गोदावरी नदीकाठी आहे. नदीला येणाऱ्या पाण्यामुळे, तसेच गोदेचे बॅक वॉटर (फुगवट्यातील
पाणी) सतत आसपासच्या परिसरात व रस्त्यावर पसरते. त्यामुळे शेतात जाण्याचा रस्ता वाहून जातो. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. सध्या शेतात
कापूस वेचणीसाठी आला आहे. त्यामुळे बगडी येथील महिलांना कापूस वेचणीसाठी थर्माकाँलच्या तराफ्याचा
वापर करून पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत शेत गाठावे लागत आहे. गोदावरी नदीच्या पाण्यातून तराफ्याद्वारे शेतात जाताना महिला. सोमवारी (ता.21) सकाळी हे चित्र पाहावयास मिळाले. या समस्या कायमस्वरूपी असून बगडी येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून येथे मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला जातो. मात्र
गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्याने हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी तराफ्याच्या
साहाय्याने जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो. तालुक्यातील अनेक गावे जायकवाडी धरणाच्या
पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत. या धरणाला सुमारे 50 वर्षे उलटून देखील धरणासाठी जमिनी घेतलेल्या गावातील
लोकांना शासनाच्या वतीने मूलभूत सुविधा अद्यापही मिळाल्या नाही. शेतकरी, ग्रामस्थांच्या या जीवघेण्या
समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार
कोण? असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. सध्या वेचणीला आलेला कापूस व तोडणीला आलेला ऊस रस्ता नसल्याने गोदावरीचे पाणी पार करून कसा काढायचा. याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. याठिकाणी पूल झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. याकरिता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीने
पाहणे गरजेचे आहे.