लिंबेजळगाव (ता.01) :- अज्ञात चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आतील तब्बल 88 ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यासह 1 लाख 6 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घरफोडीची घटना येसगाव (दिघी) येथे सोमवारी (ता.31) रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घरफोडीमुळे नागरीकांसह शेतवसतीवर भिंतीचे वातावरण पसरले आहे.
या विषयी मिळालेली माहिती अशी की, येसगाव (दिघी) येथील बाबासाहेब भागचंद भराड हे शेती करुन उदरनिर्वाह करतात, रविवारी (ता.30) रात्री जेवून करुन कुटुंबासह झोपले असताना घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा चोरट्यांनी तोंडुन प्रवेश केला. घरात काहीतरी आवाज येत असल्याने बाबासाहेब भराड हे जागे झालेले बघुन चोरट्यांनी घरातील 25 ग्रॅम वजनाचे 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे एक गंठण, 30 ग्रॅम वजनाचे 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे एक गंठण, 18 ग्रॅम वजनाचा 23 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा एक नेकलेस, 17 हजार रुपये किमतीचा 15 ग्रॅमचा एक नेकलेस, 1 हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी तसेच ट्रॅक्टर व हार्वेस्टरची चावी. असा 1 लाख 6 हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पो. कॉ. विकास जाधव, विजय त्रिभुवन यांनी धाव घेत घटनासथळाची पाहणी केली. या प्रकरणी अण्णासाहेब बाबासाहेब भराड यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.