
वाळूजमहानगर, (ता.10) – कामगाराच्या जेवणाचे डब्बे पुरविणाऱ्या मेसचालकाला आडवून त्याचा मोबाईल हिस्कावणाऱ्या दुचाकीस्वार भामट्यास एमआयडीसी वाळूज पोलीसांनी जेरबंद करत त्याच्या ताब्यातुन मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीसोबत एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार आहे.

वडगाव (को.) येथील संजय समाधान पाटील (28) हे मेस चालवून वाळुज औद्योगिक वसाहतीत डबे पोहच करतात. सोमवारी (ता 4) सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास संजय पाटील हे जेवणाचे डबे चारचाकी वाहनात ठेवुन कामगारांना पोहच करण्यासाठी जात होते. वाळुज औद्योगिक वसाहतीतील कोलगेट चौकात गतीरोधक असल्याने पाटील यांनी वाहनाचा वेग कमी केला असता पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या अनोळखी तिघांनी त्यांना आडविले. व हजार रुपयाची मागणी केली. पाटील हे पैसे देत नसल्याने एकाने त्यांच्या खिशातील 13 हजार रुपयाचा मोबाईल बळजबरीने हिस्कावून तिघेही दुचाकी वरून फरार झाले. त्यामुळे संजय पाटील यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
मोबाईल हिस्कावणारा जेरबंद–
दरम्यान मेसचालक पाटील यांचा मोबाईल हिस्कावणारे दोन संशयित बजाजनगरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचुन दोघांना ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव राम गणेश बढे (21) रा.रांजणगाव असे असून एक विधी संघर्ष बालक आहे. बढे याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने अमोल डोंगरे रा. कमळापूर या साथीदाराच्या मदतीने मोबाईल हिस्कावल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातुन चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपी अमोल डोंगरे हा फरार आहे.
यांनी केली कामगिरी –
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक पुंडलीक डाके, प्रविण पाथरकर, पोना.धिरज काबलिये, पोकॉ.यशवंत गोबाडे, हनुमान ठोके, नितीन इनामे, सुरेश कचे आदींच्या पथकाने केली.
