वाळूजमहानगर, (ता.10) – मोबाईल फोनवर बोलत पायी जात असताना दुचाकीवर पाठीमागून आलेल्या त्रिकुटातील 31 वर्षीय कामगाराचा मोबाईल हिसकावत पळ काढला. मात्र चोर चोर असे ओरडल्याने घाईगडबडीत एक जण दुचाकीवरून पडून जखमी झाला. आणि पोलिसांच्या अलगद तावडीत आला. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता बजाजनगर येथे घडली.
याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा अशय असा – बजाजनगर येथील मदन नागोराव खंदारे (वय 31) हे बागला ग्रुप कंपनीत काम करतात. खंदारे हे 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवन करुन जयभवानी चौकातुन जात असताना दशिण हनुमान मंदिरजवळ तीन इसम पाठीमागून दुचाकीवर आले. त्यापैकी मध्यभागी बसलेल्या एकाने मदन खंदारे यांच्या हातातील विवो वाय -11 या कंपनीचा 10 हजार रुपयाचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसाकावुन पळ काढला. मोबाईल हिसकावताच खंदारे यांनी चोर म्हणून आरडा ओरड केली. त्यामुळे घाई गडबडीत दुचाकीवरील तिघांपैकी पाठीमागे बसलेला एक जण खाली पडून जखमी झाला. त्यावेळी येणारा जाणार लोकांनी त्यास पकडुन मारहाण केली. दरम्यान पोलीस आले व त्यांनी त्या चोरास विचारपूस केली असता त्याचे नाव रामप्रसाद बाबासाहेब झिबरे, (वय 30) रा. पंढरपूर येथील विठ्ठल रुखमाई मंदिरजवळ, दादाराव उजागरे याच्या घरात किरायाने. असे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्याला उपचारार्थ घाटीत पाठवले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
