March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.10) – अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक केल्याचे अनेक प्रकरणे तहसील कार्यालय गंगापूर व उपविभागीय कार्यालय वैजापूर येथे प्रलंबित आहे. हे प्रकरण निकाली न काढता फक्त जवाब नोंदवला जातो. मात्र कोणतीही दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यास दिरंगाई केल्या जात असल्याचे समोर येत आहे.

याबाबत भारतीय जनता पार्टीचे गंगापूर सहसंयोजक सुरेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी (ता.10) रोजी दिलेल्या एका निवेदनात असे नमूद आहे की, गंगापूर तालुक्यातील वाळूज परिसरात असलेल्या मुरमी येथील गट क्रमांक 22 मधील दुबे यांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी 35 लाख रुपयांची तसेच मुरमी येथीलच गट क्रमांक 63 मधील जसबीर कौर सलुजा यांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी 2 कोटी 15 लाख 38 हजार 440 रुपयाची दंडात्मक नोटीस बजावली होती. ही नोटीस बजावून सुमारे दोन महिने उलटले. तरीसुद्धा दुबे व सलुजा यांच्यावर कोणतीही दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याची वेळ मर्यादा किमान 15 दिवसाची निश्चित करावी.

तसेच अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक केल्याची उपविभागी कार्यालय वैजापूर व तहसील कार्यालय गंगापूर येथील सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 47 (7) व 47(8) आणि 48(7) अन्वये अवैध गौण खनिज उत्खनन व हलविणे) यावर तरतुदीनुसार सदरील व्यक्तीच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर बोजा टाकण्यात येऊन 7/12 वर सदरील मालमत्ता खरेदी विक्रीस व तारण ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात यावेत. आणि शासकीय मालमत्तेची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रति महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार प्रशांत बंब यांना दिल्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *