
वाळूजमहानगर, (ता.8) – बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत शनिवारी (ता.8) रोजी महिलांना मार्गदर्शन करून स्वरक्षणाचे धडे दिले. निमित्त होते महिला दिनाचे. यावेळी महिला संरक्षण, हक्क विषयक विविध घोषणा देण्यात आल्याने परिसर दणाणला होता.
बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील बिअर बार व परमिट रूम स्थलांतरित करावा यासाठी नागरिकांच्या वतीने विविध मार्गाने लढा सुरू आहे. या बार व परमिट रूम समोरच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अँड पल्लवी बरडे-तोडकर, नंदा राजपूत यांनी महिलांना मार्गदर्शन करून महिला स्वसंरक्षणासाठी प्रेरणादायी धडे दिले. तसेच अन्याय सहन न करता त्या विरुद्ध सामना करण्याचे व महिला कायदे, अधिकार, हक्क याविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी रहिवासी वसाहतीमधील बार दारूचे दुकान स्थलांतरित करा, महिलांना न्याय द्या, सुरक्षा द्या. अशा विविध घोषणा दिल्याने परिसर दणाणला होता. कार्यक्रमास मोहिनी माने, भारती चौधरी, अलका गाडे, यमुना बुलबुले, कुंदा पुराणिक, मनिषा कुलकर्णी, सुप्रीया कोटलवार, मंगल घुगे, शकुंतला जायभाये यांच्यासह इतर अनेक महिला उपस्थित होत्या.
