March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.25) – स्मार्ट टीओडी मीटर लावल्यानंतर वाळुज येथील बकवालनगर, श्रीकृष्णनगरला आलेले हजारो रुपयाचे अंदाजे बिल रद्द करा, धोकादायक अवस्थेत लावलेली स्मार्ट मीटर काढून घ्या, स्मार्ट मीटरमुळे जखमी आठ वर्षीय आचल अस्वले हिला नुकसान भरपाई द्या. या व इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष वाळूज शाखेतर्फे वाळूजच्या महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करून 25 जून रोजी सहाय्यक अभियंता सचिन बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने टीओडी मीटरच्या नावाखाली सरसकट स्मार्ट मीटर बसविणे सुरू केले आहे. स्मार्ट मीटर बसविताना कुठलेही प्रकारे ग्राहकाची संमती घेतली नाही. त्याचप्रमाणे जुने विद्युत मीटर काढतानाही त्याचे कुठले प्रकारची व्हिडिओग्राफी चित्रीकरण केले नाही. स्मार्ट मीटर हे लहान मुलांचे स्पर्श होतील अशा धोकादायक स्थितीत बसविले आहेत. त्यामुळे अनेक वेळा जीवितास धोका निर्माण झालेला आहे. व अशा घटनाही घडल्या आहेत. अप्रशिक्षित कामगारांकडून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. त्यामध्ये कुठल्या प्रकारचे सुरक्षा निकष पाळले नाहीत. अनेक ठिकाणी विद्युत पोल हे पडण्याचे स्थितीत आहे. थातूरमातूर काम करून निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून ते उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे ते पडून केव्हाही जीवित हानी होऊ शकते. त्याचप्रमाणे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासह अनेक ग्राहकांच्या बिलांवर आर एन टी स्टेटस दाखवत आहेत. मीटर हे बाहेरच्या बाजूला दर्शनी भागात बसवले असताना देखील रीडिंग न घेता अंदाजे बील दिल्या जाते. या विजेच्या समस्यांना कंटाळून भाकपच्या वतीने 25 जून रोजी वाळूज येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या.

 

ग्राहकांच्या मागण्या –

धोकादायक पद्धतीने जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर / टीओडी मीटर काढून घ्यावे. अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत असलेले विद्युत पोल तातडीने सर्वे करून ते दुरुस्ती केले पाहिजे. वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करा. बकवालनगर, वाळूज येथील रहिवाशांना दिलेले अंदाजे बिले तातडीने रद्द करा. 

या निदर्शनात भाकप राज्य कौन्सिल सदस्य ऍड. अभय टाकसाळ, तालुका सहसचिव कॉ. रतन अंबिलवादे, शाखा सचिव कॉ. विठ्ठल त्रिभुवन, कॉ इब्राहिम पटेल, आशु शेख, प्रदीप सोनवणे, किशोर सोनवणे, राजू साठे, नितीन बत्तीसे, सचिन पानकडे, गणेश साळवे, इस्माईल शेख, शंकर दाभाडे, सुभाष नजन, अमोल सरोदे, संतोष काळे, शेखू नूर, पोपट कापसे, शिवाजी दातीर, बाळू शिंदे, सय्यद हमीद, संजय पांढरे, नंदू मगर, अनिल चोपडे, दिलीप आरक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी भाकपतर्फे दिलेले निवेदन स्वीकारल्यानंतर वाळुज शाखा सहाय्यक अभियंता शिष्टमंडळाशी चर्चा करताना म्हणाले की,अंदाजे आलेले बिल दोन दिवसात दुरुस्त करून बकवालनगर मधील धोकादायक विजेचे पोल मजबूत करतो असे आश्वासन दिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *