वाळूजमहानगर, ता.18 – भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी वारकरी संप्रदायातून घडणारी नवीन पिढी अत्यंत महत्त्वाची आहे. असे मत गोदाघामचे महंत परमपूज्य रामगिरीजी महाराज यांनी पिंपरखेडा येथील विठ्ठल शास्त्री महाराज चनघटे यांच्या श्रीराम ज्ञानदा वारकरी आश्रमावर निवासी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
प्रथम श्रीराम ज्ञानदा वारकरी आश्रमाचे अध्यक्ष विठ्ठल शास्त्री चनघटे महाराज व आश्रमातील सर्व साधकांनी महाराजांचे पूजन केले. यावेळी त्यांनी आश्रमातील विद्यार्थी शालेय शिक्षण, वारकरी अध्यात्मिक शिक्षण, संगीत शिक्षण, सकारात्मक जीवनशैलीचे मार्गदर्शन करताना संस्कार या पंचसूत्रीवर अभ्यास करतात याचे विशेष कौतुक विद्यार्थ्यांचे रामगिरी महाराज
यांनी केले. पारंपारिक आणि आधुनिक शिक्षणाचा समन्वय अशा प्रकारच्या गुरुकुलच्या माध्यमातून व्हावा आणि महाराष्ट्र सह देशाला सुसंस्कारित तरुण लाभावा हा विचार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी परिसरातील शेकडो भाविक स्वागत दर्शनासाठी उपस्थित होते. रामगिरी महाराज यांनी आश्रमावरून निर्माण होत असलेल्या श्री विठ्ठल संत पंचायतन मंदिराची पाहणी करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भजनी मंडळी, वारकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
