
वाळूजमहानगर – कंपनीत प्रेस मशिनवर काम करतांना एका 32 वर्षीय महिलेच्या उजव्या हाताच्या चार बोटांना गंभीर मार लागून ते कायमचे निकामी झाले. 20 सप्टेंबर रोजी झालेल्या या अपघाता प्रकरणी कंपनी मालका विरूध्द 24 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवपार्क, कमलापूर येथील शांता चंद्रकांत लोंढे (वय 32) ही महिला कामगार 2024 पासुन वाळूज औद्योगिक क्षेत्रातील साई श्रध्दा ईटरप्राईजेस दिंडे उद्योग येथे काम करते. 20 सब्टेंबर रोजी सकाळी शांता लोंढे ही कंपनीत काम करत असताना कंपनी मालक संजय भोसले याने तिला प्रेस मशिनचे कुठलेही ज्ञान नसतांना त्या मशीनवर काम करण्यास सांगितले. त्यामुळे काम
करत असतांना तिच्या उजव्या हाताची चार बोटे मशीन मध्ये अडकल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला कंपनीचे सुरपरवायझर बाळू कुऱ्हाडे व गणेश पवार यांनी उपचारार्थ वडगाव येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथे तिच्यावर व्यवस्थित उपचार न झाल्याने तिला पुढील उपचारार्थ वाळूज येथे हलवण्यात येऊन शास्त्रीक्रिया केली. त्यात एक बोट काढून टाकण्यात आले. तर उर्वरित तीन बोटांवर टाके देण्यात आले. या अपघातात तिचे बोटे कायमचे निकामी झाल्याने शांता लोंढे यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्यादी दिल्याने कंपनी मालक संजय भोसले याच्या विरूध्द 24 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
