वाळूज महानगर, (ता.29) – आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी तुर्काबाद (खराडी) येथे परिसरात मराठा समाज बांधव एकवटला असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढ्यातून माघार नाही. असा निर्धार मराठा समाज बांधवाचा असल्याचे यावेळी रविवारी (ता.29) रोजी सांगण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी समाजाच्या वतीने अनेक मोर्चे आंदोलने केली. अनेकांचा जीव गेला. आता मराठा बांधवांचा सरकारने अंत पाहू नये, सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे. नसता भयंकर परिणाम होतील.
असा सज्जड इशारा देत मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला. प्रथम तुर्काबाद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून गावातून जनजागृती फेरी करण्यात आली.
यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. फेरीनंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याजवळ टाकण्यात आलेल्या मंडपात
तुर्काबाद (खराडी), येसगाव, शिरोडी, राजुरा, दिघी, मलकापूर या गावातील मराठा समाजाच्या वतीने साखळी पद्धतीने उपोषण सुरू करण्यात आले.
आरक्षण मिळाल्याशिवाय या उपोषणातून माघार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे राजकीय पुढार्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे.