वाळूज महानगर, (ता.25) – मराठा आरक्षणासाठी समाजाने सरकारला दिलेली मुदत संपत आली. तरीही काही हालचाली होत नसल्याने शिवराई येथील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत तहसील कार्यालयासमोर गुरुवारी (ता.26) रोजी आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी समाजाच्या वतीने विविध, मोर्चे आंदोलने करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत समाजाच्या वतीने 58 मोर्चे काढण्यात आली. विविध आंदोलने केली. दरम्यान मराठा आरक्षणासाठी 45 बांधवांनी आत्मा हत्या केली. परंतु समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे जीवनात नैराश्य
आल्याने वाळूज जवळील शिवराई गावच्या नवनाथ हरिभाऊ नेव्हाल या तरुणाने अप्पर जिल्हाधिकारी व तहसीलदार गंगापूर यांना निवेदन देऊन जर सरकार मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत नसेल, तर जगायचे कशासाठी?. असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच जर बुधवारी (ता.25) पर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय नाही झाला तर, गंगापूर तहसील कार्यालय समोर आत्मदहन करेल असा सज्जड इशारा दिला त्याच्या या आत्महत्येस मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असेल. असेही त्याने निवेदनात नमूद केले आहे.