वाळूजमहानगर, (ता.17) – कामगार मंडळाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या मराठवाडा पातळीवरील कामगार नाट्य स्पर्धेला शनिवारी (ता.17) पासून सुरुवात होणार आहे. यावर्षीची 68 वी कामगार नाट्य स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन उस्मानपुरा येथील ललित कला भवनात दररोज सायंकाळी 7 वाजता करण्यात आले आहे.
स्पर्धेचे हे 68 वे वर्ष असून 2 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. शनिवारी (ता.17) डिसेंबर रोजी विवेक दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली सुधीर सेवेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सहायक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या स्पर्धेत औरंगाबाद 10, लातूर 2, नांदेड 5 अशा एकूण 17 संघांनी भाग घेत आहे. विसर्जन, अण्णांच्या शेवटच्या इच्छा, बिघडलं कुठे? काळोख देत हुंकार, अशी ही अंतिम यात्रा, आभाळमाया, दुसरा अंक, वसमत केंद्राचे ‘दानव’.
अशी नाटके या नाट्य स्पर्धेत सादर होणार असून, ती प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहेत. या स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन मराठवाड्याचे सहायक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.
