
वाळूजमहानगर, (ता.20) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील न्यू शहीद भगतसिंह किलबिल प्राथमिक शाळेत मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच खेळखेळू – बक्षीस जिंकू विविध स्पर्धां व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता.19) रोजी करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथकाच्या पीएसआय कांचन मिरधे, पोलीस हवालदार कल्पना खरात, पोलीस अंमलदार कल्पना नागरे, अनिता खैरे, अंबिका दारुंटे, ग्रामपंचायत सदस्य नंदाताई बडे, प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्ष लोहार, सविता शिंदे, तसेच महिला पालक प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. या स्पर्धांमध्ये उखाणे स्पर्धा, रस्सीखेच, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, नृत्य यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना पैठणी साडीसह अनेक बक्षीसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा राबवून महिलांना संधी निर्माण करून दिली. व महिलांनी देखील त्या संधीचा लाभ घेतला. यामुळे पीएसआय कांचन मिरधे यांनी शाळा व महिला पालकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष आहेर यांनी तर आभार आप्पासाहेब मिसाळ यांनी मानले.
