
वाळूजमहानगर, (ता.13) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांची जयंती शुक्रवारी (ता.12) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्ध वक्ते श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडे, समूहगीत, भाषण, नृत्याचे सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली. दोन विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा परिधान करून त्यांच्याविषयी स्वगत गीत गायीले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी व्याख्यान दिले.
यावेळी त्यांनी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध उदाहरणे देत महामानवांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजाबद्दल असलेली आत्मीयता, समाजाच्या उन्नतीसाठी घेतलेले खडतर परिश्रम याविषयी सखोल विवेचन केले. शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. तेच आपल्या शैक्षणिक क्रांतीचे प्रेरणास्थान आहे. असे आपल्या मनोगतात म्हटले. या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, प्रमुख अतिथी श्रीमंत कोकाटे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, समन्वयक राणी सावंत, गहेना शादीजा यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
