
वाळूजमहानगर, (ता.18) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (ता.17) रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले. अध्यक्षस्थान शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंकज भारसाखळे होते.

यावेळी शाळेतील एनसीसी छात्र सेनेने आपल्या संचलनाचे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवी दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ब्राझील नृत्य, पाॅम पाॅम नृत्य, होला हब नृत्य सनफ्लाॅवर नृत्य, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी म्युझिकल नृत्य, डंबेल नृत्य, बांबू नृत्य, लेझीम नृत्य तर माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी झुम्बा नृत्याचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष, प्रमुख अतिथी यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. ही मशाल शाळेचे राष्ट्रीय स्तरासाठी व राज्यस्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते मैदानात फिरवण्यात आली. राजेंद्र ठोंबरे, राणी खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, शाळेने आमच्या विद्यार्थ्यांना आपले सुप्त गुण प्रकट करण्यासाठी एवढ्या उंचीवर नेल्याबद्दल शाळेचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर प्रमुख अतिथी पंकज भारसाखळे यांनी मनोगतात खेळाचे, शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून देत सतत खेळत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी मनोगतात पालकांना आवाहन करताना म्हटले की, मुलांना निसर्गाच्या सानिध्यात खेळू द्या, वाढू द्या. शरीर बळकट असेल तर सर्व कार्य साध्य होतात असेही सांगितले. त्याचबरोबर स्वतःच्या यशस्वी जीवनाचे गमक देखील पालकांसमोर व्यक्त केले. या क्रीडा महोत्सवात खो -खो, कबड्डी, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स व इतर क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगंधा मिश्रा तसेच ईश्वरी जोशी, तेजस खंडेलवाल, स्नेहल मेंगडे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेची विद्यार्थी अध्यक्ष अनमोल सेनवाल हिने आभार मानले. या महोत्सवाच्या उद्घाटनास शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव मीनाक्षी भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, समन्वयक राणी सावंत, गेहना शादीजा, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचाही बहुसंख्येने प्रतिसाद लाभला.
