वाळूजमहानगर – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल नेहमीच विविध उपक्रमांच्या बाबतीत अग्रेसर असते. यावर्षीदेखील दिवाळीच्या पूर्वसंध्येला अनुसरून शाळेतील कला शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरेख आकाशकंदील बनवण्याविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांकडून स्वतःच्या क्षमता वापरून नाविन्यपूर्ण आकाश कंदील बनवून घेतले.
या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत आकर्षक व आकारबद्ध आकाश कंदील बनवून सर्वांची मने जिंकली. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त शाळेत वर्ग सजावटीचा देखील उपक्रम घेण्यात आला. यावेळी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाची सुंदर रीतीने सजावट केली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी छोटासा कार्यक्रम देखील आयोजित केला. यात शाळेतील संगीत विभागातील शिक्षक रवींद्र उमाळे व योगेश खिल्लारे यांनी दिवाळीचे वर्णन करणारे गीत सादर केले. तद्नंतर शाळेतीलच शिक्षिका रूपाली दुधे, सपना पाटील, अमृता देशमुख यांनी देखील दिवाळीचे माहात्म्य सांगणारे गीत सादर करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक रवी दाभाडे यांनी आपण दिवाळी का साजरी करतो? या पाठीमागची कारणमीमांसा विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेच्या समन्वयक राणी सावंत, शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करून झाली.