
वाळूजमहानगर, (ता.31) – भजन हे ईश्वराशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. भजनामुळे सामाजिक संस्कार निर्माण होते. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट करण्याचे मोठे माध्यम भजन असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात भजनाला प्राधान्य दिले पाहिजे. असे प्रतिपादन कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद -सिंगल यांनी राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर दै. सकाळचे निवासी संपादक दयानंद माने, लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांची उपस्थिती होती. तणाव कमी करण्यासाठी भजन करणे गरजेचे असून, दुःख पेलण्याचे सामर्थ्य ही भजनामुळे माणसात निर्माण होते. भजनाचे संस्कार प्रत्येकाने आपल्या मुलांना द्यावे. असे आवाहनही विनिता-वेद सिंगल यांनी केले. राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे कौतुकही यावेळी त्यांनी केले.
पांडुरंगाच्या नामस्मरणाने नैतिकता निर्माण होऊन माणसाच्या आयुष्यात बदल होते. असे यावेळी बालाजी मुळे म्हणाले. दै.सकाळचे निवासी संपादक दयानंद माने, युवराज पडियाल यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. कामगारांच्या जीवनात भजन आनंद फुलविते. आणि आनंद फुलवण्याचे कार्य कामगार कल्याण मंडळ करत असल्याने मला समाधान असल्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यावेळी प्रस्ताविकात म्हणाले. या स्पर्धेची सुरूवात लातुर येथील भजनी संघाच्या सादरीकरणाने झाली. दोन दिवसीय स्पर्धेत महिला व पुरुष यांचे 38 भजनी मंडळ (संघ)चे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय अहिरे यांनी तर आभार सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी मानले.
