बोनस न देणाऱ्या कंत्राटदार व कंपनीवर कारवाई करा
वाळूजमहानगर, ता.30 – कायमस्वरूपी काम करणाऱ्या कामगारांबरोबरच कंत्राटी कामगारांना सुद्धा दिवाळी बोनस देण्यात यावा. बोनस न देणाऱ्या कंपनी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी न्यू पॅंथर कामगार सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांना न्यू पॅंथर कामगार सेनेचे अध्यक्ष अनिल जाभाडे यांनी दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, वाळूज व शेंद्रा औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्यामध्ये कायमस्वरुपी कामगारासोबत उत्पादन विभागात कंत्राट कामगार काम करत असतात. दिवाळी सणानिमित्त कायमस्वरुपी कामगारांना नियमानुसार बोनस दिला जातो. मात्र त्याच कंपनीत कायमस्वरूपी कामगारांबरोबर कंत्राटी कामगारांना बोनस दिला जात नाही. परिणामी कंत्राटी कामगार बोनस पासून वंचित राहतात. किंवा त्यांना बोनसपासून वंचीत ठेवले जाते. त्यामुळे अशा गरीब कामगारांची दिवाळी अंधारात जाते. हा प्रकार थांबविण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे बोनस अॅक्टनुसार पत्र काढून कंपनीच्या प्रत्येक व्यवस्थापनास व कंत्राटदारास असंघटीत कामगारांना बोनस देणे भाग पाडून त्यांचा अहवाल आपल्या कार्यालयात मागवून घ्यावा. व ज्या व्यवस्थापनाने किंवा कंत्राटदाराने आदेशाचे पालन केले नसेल, अशा व्यवस्थापन व कंत्राटदारावर अॅक्टनुसार कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.