March 23, 2026


वाळुज महानगर (ता.7)- भरधाव जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी चिरडून जागीच ठार झाला. तर दोन गंभीर जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथे बुधवारी (ता.7) रोजी झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, कॉलेज सुटल्यानंतर दुचाकी वरून तीन विद्यार्थी ढोरेगाव रोड क्रॉस करत असताना छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याकडे जाणाऱ्या (एम एच 14, बी टी- 2797) बसने दुचाकी (एम एच 20, ई यु-7154) ला जोराची धडक दिली. या अपघातात गौरव संतोष मिसाळ (19) व गौरव संजय सुगदान (19) दोन्ही रा.भोयगाव हे दोन विद्यार्थी दूर फेकल्या केल्याने ते गंभीर जखमी झाले. तर किरण दत्तात्रेय काजळे (19) रा.आनंदवाडी हा विद्यार्थी बसच्या चाकाखाली दुचाकीसह जवळजवळ 100 फूट फरपटत गेला. त्यात तो जागीच ठार झाला. जखमीना छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पत्रकार दत्तात्रय जोशी, सरपंच अयुब पटेल, आमोल पाठे, ग्रामपंचायत सदस्य मुकतार पटेल, सोयब पठाण यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झोरे, राहुल वडमारे, विष्णु बाप्ते अपघातस्थळी आले. त्यांनी बस रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. तर विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण, आगार प्रमुख विठ्ठल धुतमल, वाहतूक नियंत्रक भाऊसाहेब जाधव, वाहतूक प्रवेशक नारायण शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *