वाळूजमहानगर, (ता.3) – घरगुती गॅस घेऊन भरधाव जाणारी पिकअप व सिल्लोड आगारातून पाचोरा जिल्हा जळगावकडे जाणारी एसटी महामंडळाची बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चालक ठार तर बस मधील जवळजवळ 45 प्रवासी जखमी झाले. त्यातील 10 जण गंभीर असल्याची माहिती मिळते. हा अपघात शुक्रवारी (ता.3) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सिल्लोड कन्नड महामार्गावरील वांगी फाट्याजवळ झाला. जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात व छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
