वाळूजमहानगर, ता.26- कंपनीच्या मटेरिअल गेटवर येऊन दोन आरोपींनी तेथील सुरक्षा गार्डला दमदाटी करत बळजबरीने कंपनीत प्रवेश करुन कामगारांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच कामगारांना जिवे मारण्याची धमकी देवुन कंपनीतील सर्व मशीन बंद करुन काम बंद पाडुन नुकसान केले. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (ता.24) डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी रिक्षा बॉडी, एम – 170 जोगेश्वरी येथे मंगळवारी (ता.24) रोजी पहाटे अंदाजे 2 वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम दुचाकीवर बसुन कंपनीच्या मटेरिअल गेट जवळ आले. आम्ही कंपनीचे एच आर आहे. तपासणीसाठी कंपनीत जायचे आहे. असे ते म्हणाले. परंतु आरोपी हे संशयीत वाटत असल्याने सुरक्षा गार्ड सुभाष घुले त्यांना कंपनीत जाता येणार नसल्याचे सांगितले. तेव्हा दोघांनीही घुले यांना शिवीगाळ करुन धक्काबुकी केली. व मेटेरिअल गेट बळजबरीने उघडुन कंपनीत घुसले. आणि प्रेस शॉप विभागात काम करीत असलेल्या कामगारांना दमदाटी करुन कंपनीतील प्रेश मशीन बंद केल्या. यावेळी कंपनीतील कामगार रमेश झांबरे, संजय केदार, नारायण म्हस्के यांनी त्यांना अटकाव केला असता रमेश झांबरे या कामगाराला धक्काबुक्की करुन इतर कामगारांना शिवीगाळ केली. तसेच कंपनीतील कामगारांना जिवे मारण्याची धमकी देवुन कंपनीतील सर्व मशीन बंद करून दुचाकीवर बसुन कंपनीतून निघुन गेले. या घटने बाबत सुरक्षारक्षक घुले यांनी कंपनीचे फिल्ड ऑफीसर नरहरी शिंदे व भारत लुबाळे यांना कंपनीत बोलावुन घटनेबाबत माहिती दिली होती. याप्रकरणी सेक्युरिटी गार्ड सुभाष देवराव घुले (वय 68) रा. साठेनगर, वाळुज ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी करत होते कंपनीतच काम –
कंपनीतील कामगार झांबरे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले. त्यांचे नाव अंकुश आरोटे व राजेश आहिरे दोन्ही रा. विटावा ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे आहे. दोन्ही इसम है दोन वर्षापूर्वी कंपनीत कामाला होते.
कारण अद्याप अस्पष्ट –
दोन्ही आरोपी हे वाळूज औद्योगिक लक्ष्मी बॉडी या कंपनीत दोन वर्षांपूर्वी कामाला होते. मात्र त्यांनी अचानक कंपनीत घुसून धुडगुस का घातला. या मागचे कारण मात्र समजू शकले नाही. या कामगारांचा कंपनीतील पूर्वीचा हिशोब किंवा देणे घेणे बाकी असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
वाळुज औद्योगिक वसाहतीत खळबळ –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून चोऱ्या माऱ्यासह घरफोड्या व कुमारीच्या घटना नित्याच्याच आहेत. मात्र कंपनीमध्ये बळजबरीने घुसून धुडगूस घातल्याची ही घटना पहिल्यांदाच घडल्याने वाळुज औद्योगिक वसाहतीतील कामगार व उद्योजकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.