
वाळूजमहानगर, (ता.14)- पाचशे रुपयाच्या बनावट नोटा जवळ बाळगल्या प्रकरणी वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथून एका त्रिकुटास जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून 27 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयाच्या पुर्ण छापलेल्या नोटा तसेच अर्धवट छापलेल्या 455 नोटांची पाने जप्त करण्यात आली.

राजू उत्तम गवई (44), सुभाष भाऊराव घुले (40), रामदास अशोक बोराडे (28) हे सर्व रा. रमाई चौक, सलामपुरेनगर वडगाव कोल्हाटी अशी संशयीत आरोपीचे नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांना वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरेनगर येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असल्याची माहिती
मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. प्रविण पाथरकर, पोह धिरज काबलिये, यशवंत गोबाडे, सुरेश भिसे, गणेश सागरे यांनी पंचासह मंगळवारी (ता.12) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रमाई चौक येथील घरात छापा मारला. त्यावेळी तेथे राजू उत्तम गवई, सुभाष भाऊराव घुले, रामदास अशोक बोराडे हे मिळून आले. तसेच प्लास्टिकच्या पिशवीत 455 ए फोर साईज पेपरच्या एका बाजूला 500 रुपयाच्या भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या हुबेहुब नोटा दिसून आल्या. यावेळी पोलिसांनी राजू गवई यांची अंगझडती घेतली असता 27 हजार रुपये किमतीचे 54 नोटाचे बंडल मिळून आले.
याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी सांगितले की, सहजापूर वडगाव रस्त्यावरील कचऱ्यात भंगार गोळा करताना प्लास्टिकच्या एका पिशवीत या नोटा सापडल्या. या नोटाचा देशी दारूच्या दुकानात वापरल्याचे राजू गवई यांनी पोलीसांना सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास दुय्यम पोलिस निरिक्षक जयंत राजूरकर करीत आहे.
