
वाळूजमहानगर, (ता.20) – शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातेतील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रमाणेच बजाजनगर येथेही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. बजाजनगरातील गरुड झेप ॲकडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने ॲकडमीच्या वस्तीगृहातील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.20) सकाळी उघडकीस आली. 
गरुड झेड ॲकडमीत दोन महिन्यात आत्महत्या करनाऱ्याची ही दुसरी घटना आहे. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगरातील गरुडझेप ॲकडमीत पोलीस व सैन्य भरतीचे प्रशिक्षण दिले जाते. या ॲकडमीत छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी पोलीस व सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. या ॲकडमीचे बजाजनगरातील विविध ठिकाणी वस्तीग्रह आहेत. त्यातीलच आम्रपाली बुध्द विहाराच्या पाठीमागे असलेल्या मुलींच्या वस्तीगृहात राहणाऱ्या लीना श्रीराम पाटील (19) रा. सावखेडा ता. पाचोरा जिल्हा जळगाव या विद्यार्थिनीने वस्ती गृहाच्या टेरेस वरील बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
अशी आली घटना उघडकीस –
मंगळवारी (ता.20) सकाळी 9 वाजेच्या सुमारास लिना पाटील ही विद्यार्थीनी क्लासेसला न आल्याने तिचा शोधा शोध सुरू झाला. वस्तीगृहातील तिच्या रुममध्ये ती मिळून आली नाही. त्यामुळे वस्तीगृहातील टेरेसवर जाऊन पाहिले असता टेरेसवरील बाथरुमचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. दरवाजा ठोठावूनही आतुन प्रतिसाद येत नसल्याने वार्डन यांनी ॲकडमीचे संचालक प्रा.निलेश सोनवणे व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संपर्क साधुन माहिती दिली. ही माहिती मिळताच सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत बाथरुमचा दरवाजा तोडला. तेव्हा लिना पाटील ही बाथरुममध्ये असलेल्या लोखंडी गजाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. पोलीसांनी या वस्तीगृहातील ज्योती राजपुत व आझम पठाण यांच्या मदतीने लिना पाटील या विद्यार्थीनीस बेशुध्द अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले. तीला डॉक्टरांनी तपासून सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मयत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत.
दोन महिन्यात दोघांची आत्महत्या –
बजाजनगर येथील गरुडझेप ॲकडमीत दोन महिन्यापुर्वी 28 डिसेंबर रोजी निपाणी आडगाव, ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथील 18 वर्षीय श्रीकांत दशरथ वाघ या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने ॲकडमीच्या बाथरुमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेचा तपास गुलदस्त्यात असतानाच मंगळवारी (ता.20) रोजी लिना पाटील या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीनेही गळफास घेऊनच आत्महत्या केली. तिच्या सुद्धा आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दोन महिन्यात झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे वाळूज परिसरासह गरुड झेप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
