
वाळूजमहानगर, (ता.20) – बजाजनगर येथील नव्याने झालेल्या बियर बार व परमिट रूममध्ये येणाऱ्या लोकांकडून विक्षिप्त चाळे होत असल्याने महिला व मुली त्रस्त आहेत. त्याचाच परिणाम म्हणून काही संतप्त महिलांनी दुकानाच्या नाम फलकाला गुरुवारी (ता.20) रोजी काळे फासले.
बजाजनगर येथील एक्स -147 दिशा कॉम्प्लेक्स इंद्रप्रस्थ कॉलनी येथे बियर बार व परमिट रूम सुरू झाले आहे. नागरी वसाहतीत सुरू झालेल्या या दुकानाला येथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे हे दारूचे दुकान तात्काळ बंद करावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एक भाग म्हणून येथील महिलांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन सुरू झालेले दारूचे दुकान बंद करावे अशी मागणी केली आहे. तरीही येथील दुकान बिन दिकतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या दुकानात येणारे दारुडे महिला व मुलींना पाहून विक्षिप्त चाळे करतात. येता जाताना काही मुले कर्णकर्कश हॉर्न वाजवून व गाडीचा रेस वाढवून मुली, महिलांचे लक्ष आकर्षित करतात. तसेच शिवीगाळ करणे महिलांना मुलींना पाहून विचित्र हावभाव करणे. असे प्रकार वाढले आहे. त्यामुळे येथील महिलांनी गुरुवारी (ता.20) रोजी रोष व्यक्त करत दुकानाच्या नामफलकाला काळे फासले.
यावेळी माया बहादुरे, रोहिणी माने, मंगल मोतींगे, सुवर्णा कोळी, शोभा राजुळे, विमल गावंडे, अलका गाडे, यमुना बुलबुले, यशोदा आवटे, मंगल घुगे, कुंदा पुराणिक, शकुंतला जायभाय, भारती चौधरी, शारदा लोहार, संजीवनी गोरे, शकुंतला गीदडे, सुषमा नारखेडे, सुप्रिया कोलटवार, कांचन शेवाळे, अलका गाडे आदी महिला उपस्थित होत्या.
