
वाळूजमहानगर, (ता.13) – सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. ज्या ठिकाणाहून हे राजकारण चालते ते ठिकाण म्हणजे विधान भवन. म्हणून बजाजनगर येथील भगवान महावीर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहलीचे औचित्य साधून विधान भवनाला भेट देण्याचा मनसुबाआखत थेट विधान भवनावर धडक घेतली.
प्रत्येक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येते. अनेक शाळा नैसर्गिक स्थळांबरोबरच ऐतिहासिक स्थळे पाहणे पसंत करतात. मात्र भगवान महावीर स्कूल, बजाजनगर येथील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधानभवन येथे भेट देत विधान भवनाची माहिती जाणून घेतली. या भेटीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इयत्ता 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांची शाळेने मुंबई येथे सहल आयोजित केली होती. यावेळी विधानभवन येथे भेट दिली. या प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सहकारी, विधानसभेतील अधिकारी सानप यांनी विद्यार्थ्याना विधानसभा व विधानपरिषद सभागृहाचे कामकाज कसे चालते, सभागृहाची सर्व व्यवस्था कशी असते. याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तरं देत समधान ही केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण अशी माहिती तर मिळालीच त्याचबरोबर हा एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. या भेटीसाठी अंबादास दानवे, धर्मराज दानवे यांनी आयोजक विवेक चांदोडकर यांना परवानगी दिली. ज्यामुळेच हे सर्व शक्य झाले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले, विजया दरगुडे, रत्नमाला येवेलकर, विशाल कामळे आदी शिक्षक सोबत होते.
