March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – साप्ताहिक सुट्टी व रमजान ईद अशा दोन दिवस सुट्टी असल्याने बंद असलेले बजाजनगर येथील पोस्ट ऑफिस अज्ञात चोरट्यांनी फोडले. मात्र तिजोरी फोडता न आल्याने किंवा घेऊन जाता न आल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. त्यामुळे तिजोरीसह आतील रोख रक्कम शाबीत राहिली. ही चोरीची घटना मंगळवारी (ता.1) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 57 वर्षीय संजय रामलाल पाटील हे बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर म्हणून काम करतात. शनिवारी (ता.29) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिपाई अरविंद जाधव यांनी कुलूप लावून पोस्टऑफिस बंद केले होते. रविवारी साप्ताहिक व सोमवारी रमजान ईद असल्यामुळे दोन दिवस पोस्ट ऑफिसला सुट्टी होती.
मंगळवारी (ता.1) रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शिपाई अरविंद जाधव हे पोस्ट ऑफिसमध्ये आले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. ही माहिती त्यांनी पोस्टमास्तर संजय पाटील यांना दिली. त्यामुळे पाटील यांनी तात्काळ इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट सचिन तायडे यांच्यासह ऑफिसमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी पोस्ट ऑफिसचे मागील मुख्य चॅनेल गेट व दरवाजाचे कोंडे कट केलेले होते. त्याला लावलेले लॉक त्याठिकाणी नव्हते. त्यानंतर दोघांनी पोस्ट ऑफिसच्या आत जावुन पाहणी केली असता पोस्ट ऑफिसचे कॅश काउंटरच्या ड्रावरचे लॉक तोडुन त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकल्याचे दिसले. तसेच रोख रक्कम ठेवलेली पोस्ट ऑफिसची मुख्य तिजोरी चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले. त्याचे हॅन्डल एका बाजुने चोरट्याने काढलेले होते. मात्र सुदैवाने कॅश काउंटरमधील सर्व कॅश तिजोरीमध्येच होती. मात्र चोरट्यांनी ही तिजोरी फोडण्याचा किंवा घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोस्टमास्तर संजय रामलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *