
वाळूज महानगर – एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगरातील रामलीला मैदानावर
विजयादशमी (दसरा) च्यादिवशी यंदाही नेहमीप्रमाणे 65 फूट उंचीच्या रावण पुतळ्याचे भव्य दहन गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
गेली तब्बल तीस वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी झाली. 
राम-रावण युद्धाच्या या पारंपरिक दहन सोहळ्याला परिसरातील हजारो-लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “दृष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्त्वगुणांचा विजय” हा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजातील वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी प्रतीकात्मक ठरतो.

या भव्य कार्यक्रमाला माजी केंद्रीय वित्तमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रावणाच्या 65 फूट उंच पुतळ्याला अग्नी प्रज्वलित करून दहन करण्यात आले. 
कार्यक्रमादरम्यान वातावरणात “जय श्रीराम”च्या घोषणा दुमदुमल्या. रावण पुतळ्याचे दहन होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. आकाशात फटाक्यांची आतषबाजी उडाली आणि मैदान परिसर प्रकाशमय झाला.
गेल्या तीन दशकांपासून एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगर येथे राम जानकी प्रतिष्ठानच्या वतीने हा सोहळा सातत्याने आयोजित केला जात आहे. रामलीला आणि रावण दहनाची ही परंपरा नागरिकांमध्ये एकात्मता, भक्ती आणि सांस्कृतिक जाणीवा दृढ करण्यास महत्त्वाची ठरत आहे.

