March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.2) – वाळूज येथील कंपनीत कार्यरत असताना कंपनीचे अंदाजे 2 कोटी 35 लाख 57 हजार 860 रुपये किंमतीचे 7 लाख 85 हजार 262 शाफ्ट परस्पर विक्री केले. तसेच मारीया सेक्युरीटी कंपनीकडुन कामगार वेतनाचे कमीशन म्हणून 3 लाख 15 हजार रुपये स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी घेऊन कंपनीचा विश्वासघात करुन कंपनीची आर्थिक नुकसान करुन फसवणूक केल्याप्रकरणी प्लांट हेड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
वाळुज औद्योगिक वसाहतीत विनोद शहा यांची स्टारवेज इंजिनिअर्स प्रा.लि. प्लॉट नं. डब्ल्यू 95 ही कंपनी आहे. ही कंपनी बजाज ऑटोला लागणारे वाहनांचे सुटे भाग व इतर मालाचा पुरवठा करते. कंपनीमध्ये कुशल व अकुशल असे सुमारे 200 कामगार मारीया, सेक्युरीटी सर्व्हसेस प्रा.लि. कमलापूर रोड, वाळुज यांच्यामार्फत काम करतात. कंपनीमध्ये सात ते आठ वर्षापासून प्लांट हेड म्हणून राजेश किसन गौरीकर हे काम पाहत होते. त्यांनी मारिया सेक्युरिटी सर्व्हींस प्रा.लि. या कपंनीला स्टारवेज कंपनीमध्ये मनुष्यबळ पुरवण्याचे काम दिले होते. व कंपनीचे संचालक ईसाक खाँ याकूब खाँ पठाण यांना सांगीतले की, आम्हाला एकूण 80 कामगार वेल्डींग विभागात तसेच सीएनसी विभागास 15 कामगार लागणार आहेत. परंतू सिएनसी विभागात काम करणारे 15 कामगारांचे पगार हा तुमच्या कंपनीच्या खात्यावर जमा करु. तो पुर्ण पगार तुम्ही मला रोख काढून आणुन देत जा. मी स्वत: कामगारांचा पगार करेल. त्यावरुन 6 एप्रिल 2021 ते 5 अगस्ट 2022 या कालावधीत राजेश गौरीकर यांनी कामगारांचे पगार म्हणून 34 लाख 74 हजार 641 रुपये मारिया सेक्युरिटीचे ईसाक खा पठाण यांच्याकडून घेऊन त्यातून 31 लाख 58 हजार 765 रुपये कामगारांचा पगार दिला. उर्वरीत रक्कम 3 लाख 15 हजार 876 रुपये रोख व काही रक्कम राजेश गौरीकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोरे चौक, वाळुज व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळुज येथील खात्यावर 16 जुलै 2021 रोजी 30 हजार 209 रुपये, 15 अगस्ट 2021 रोजी 20 हजार रुपये, 29 अगस्ट 2021 रोजी 10 हजार रुपये असे 66 हजार 221 रुपये स्वत:च्या खात्यावर घेऊन त्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.

स्टारवेज इंजिनिअर्स प्रा.लि. ही कंपनी एलसीजीएस असेम्बली तयार करते. त्यासाठी लागणारे शाफ्ट हे चाकण येथील स्टार फासनर येथुन आवश्यकतेनूसार आणते. त्यानंतर इतर कंपन्यांकडून वेगवेगळे पार्ट मागवून त्यांची वेल्डींग व असेम्बली कंपनीमध्ये होते. त्याचा पुरवठा बजाज कंपनीस केला जातो. 1 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत राजेश गौरीकर, प्लांट हेड असताना त्यांनी असेम्बलीसाठी लागणारा कच्चा माल (शाफ्ट) 56 लाख 81 हजार 013 एवढ्या नग शाफ्टची आवश्यकता होती. परंतू राजेश गौरीकर यांनी स्टार फासनर या कंपनीकडून 67 लाख 18 हजार 620 एवढे शाफ्ट नग मागविले. ज्यामध्ये 10 लाख 37 हजार 607 एवढे अतिरीक्त शाफ्टची मागणी करुन ते शाफ्ट स्टारवेज कंपनीचे खोटे व बनावट चलान तयार करुन त्यावर सहया करुन ते शाफ्ट परस्पर एस के ट्रेडर्सला विक्री केले. त्यापैकी एस के ट्रेडर्स नावाचे 4 चलानाची छायांकित प्रत राजेश गौरीकर यांचे कॅबिन मध्ये मिळुन आल्या आहे. त्यानंतर 19 एप्रिल 2023 रोजी जी.एस.सुंदर यांनी कंपनीची अंतर्गत तपासणी केली असता 2 कोटी 35 लाख 57 हजार 860 रुपये किंमतीचे 7 लाख 85 हजार 262 शाफ्ट हे हिशोबाप्रमाणे कंपनीतून गायब असल्याचे आढळून आले. याबाबत कपंनीचे मालक विनोद शहा यांनी गौरीकर यांना मेल व्दारे व प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी विचारणा केली असता, राजेश गौरीकर यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. तसेच तपासणी झाल्यापासुन राजेश गौरीकर हा कंपनीमध्ये कामासाठी आला नाही.

याप्रकरणी कंपनीच्या वतीने शाम महादेवराव मानके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी राजेश किसन गौरीकर, (47), रा. एमएसईबी ऑफिस जवळ सिडको गार्डन गेट, सिडको वाळूज महानगर-1, छत्रपती संभाजीनगर (हल्ली मुक्काम- फ्लॅट नं. 112 गौरी मेडॉज-3, बेसा चौक, मानेवाडा रोड, नागपूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *