
वाळुज महानगर, (ता.21) – साजापूर येथे 20 वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या व वर्षभरापासून वांटेड असलेल्या 23 वर्षीय आरोपीला वाळुज एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी 20 डिसेंबर रोजी जेरबंद केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साजापूर येथे 30 डिसेंबर 2024 रोजी अल्लाफ शेख उस्मान यास सराईत गुन्हेगार सागर संतोष केदारे व त्याच्या सोबतचे 3 साथीदार यांनी चाकुने पोटावर मारून गंभीर जखमी केले होते. तेव्हापासून आरोपी फरार होता. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने फरार (वांटेड) आरोपी पकडणे संदर्भात वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलीगं करीत असतांना विशेष पोलीस पथकाला माहीती मिळाली की, अल्ताफ शेख याच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या व फरार असलेला आरोपी संभाजी किशन सोनगिरे (वय 23) वर्ष रा. हनुमान मंदिराजवळ बाजार गल्ली, साजापुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर हा राजणगाव (शेणपुंजी) परिसरात फिरत आहे. या माहितीवरून त्याचा शोध घेऊन शनिवारी 20 डिसेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त, पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोउपनि. प्रविण पाथरकर, पोहवा. सुरेश कचे पोअं. सुरेश भिसे, नितीन इनामे, राजाराम वाघ, समाधान पाटील, संदिप तागड, रोहित चिघळे, वैभव गायकवाड यांनी केली.
