वाळूजमहानगर, ता.5 – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बाळगणाऱ्या तीन जणांना वाळुज एमायडिसी पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून दुचाकी व जवळजवळ 70 हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगरात एक इसम प्रतिबंधीत गुटक्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीनंतर बजाजनगरातील कोलगेट चौकात सापळा रचुन बाजीराव नरसिंग नांदे (रा. बजाजनगर) यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील 35 हजार 707 रुपये किमंतीचा गुटका जप्त करण्यात आला आहे. दुस-या घटनेत पंढरपूरात गुटका विक्री करण्यासाठी साठा करुन ठेवलेल्या अशरफ शेख चॉंद शेख (रा.पंढरपूर) याच्या घरी पोलीसांनी छापा मारला. दरम्यान, अशरफ शेख हा घरी मिळून न आल्याने पोलीसांनी त्याच्या घराची झाडा-झडती घेतली असता पोलीसांना 24 हजार 547 रुपये किमंतीचा गुटका मिळून आला आहे. तिस-या घटनेत कमळापूर-रांजणगावरोडवर सापळा रचुन गुटका विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वार महेंद्र रविंद्र अहिरराव रा.ओमसाईनगर, जोगेश्वरी यास पकडले. संशयित आरोपी महेंद्र अहिरराव याच्या दुचाकीवर असलेल्या गोणीची तपासणी केली असता पोलीसांना या गोणीत 11 हजार 295 रुपये किमंतीचा गुटका मिळून आला. त्याच्या ताब्यातून दुचाकी ( एम.एच.16, एजे-2078) जप्त केली असून आरोपी महेंद्र याने हा गुटका अझहर अहमद बेग रा.हरिसिध्दी लॉन्स, कमळापूर याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे गुटकामाफियात चांगलीच खळबळ उडाली आहे.