
वाळुज महानगर, (ता.2) – माझ्या नवऱ्याला वाचवा अशी आर्त हाक मारत ती धावतच पोलीस ठाण्यात आली. आणि पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठत आत्महत्या करण्यापासून रोखले. त्यामुळे एका 30 वर्षीय तरुण कामगाराचा जीव वाचला. गुरुवारी (ता.2) रोजी दुपारी केलेल्या या पोलिसांच्या कामगिरींचे वाळूज परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की. बजाजनगरमधील जयभवानी चौकमध्ये पती-पत्नी भाड्याने राहतात. त्यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून दोघेही खाजगी कंपनीमध्ये काम करतात. तो सतत दारू पित असल्याने पती पत्नी खटके उडत. याच कारणावरून त्याने रात्री हातावर ब्लेड मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी परत दोघांमध्ये वाद झाला. पतीने अजून काही बरेवाईट करून घेऊ नये त्यासाठी पत्नीने बाहेर न जाण्याचा आग्रह केला. तरीही पती ऐकत नसल्याने पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले. आणि पोलिसांना माहिती दिली. फोन उचलत नसल्याने पत्नीने पतीला व्हिडीओ कॉल केला असता पती छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत असल्याचे त्यात दिसले. त्यामुळे तिने माझ्या पतीला वाचवा अशी आर्त हाक दिली. 
त्याचवेळी दुपारच्या जेवणासाठी जात असलेल्या पोलिसांना ही महिला दिसली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस अंमलदार योगेश शेळके, महिला हेड पोलीस कॉन्स्टेबल रेखा चांदे, पोलीस अंमलदार योगेश शेळके, विनोद नितनवरे यांनी तात्काळ घायनस्थळी धाव घेतली. आतून दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून गळ्याला लावलेला फास काढून पतीला खाली उतरवले. पती पत्नीच्या झालेली वादाची कहाणी तो पोलिसांना सांगत होता. दुपारच्या जेवणाचा विचार न करता पोलिसांनी प्रसंगावधान राखून दाखवलेल्या तत्परतेमुळे एका 30 वर्षीय तरुणाचा जीव वाचल्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलिसांचे वाळूज परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
