
वाळूजमहानगर – तिसगाव येथील देवगिरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 11 सप्टेंबर रोजी वाहून गेलेल्या राधा नागजी सावडा या राजस्थानी मुलीच्या नातेवाईकास जिल्हा नैसर्गिक आपत्ती कक्ष निधीतून चार लाख रुपयाची आर्थिक मदत शुक्रवारी (ता.16) सप्टेंबर रोजी सुपूर्त करण्यात आली.
गोपालन व दूध विक्रीतून उपजीविका भागविणाऱ्या राधा हिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी. यासाठी तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, माजी सरपंच संजय जाधव यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णू जाधव यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मदत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती कक्ष निधीतून मयत राधा हिच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयाची आर्थिक मदत शुक्रवारी (ता.16) सप्टेंबर रोजी रात्री सुभेदारी विश्रामगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, अप्पर तलहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी अनिल कुलकर्णी, तलाठी दिलीप जाधव, आमदार संजय सिरसाठ, तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, माजी सरपंच संजय जाधव आदींची उपस्थिती होती.