February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.21) – जल कुंभाच्या भूमिपूजनापासून अनेक वेळा आलेल्या अडथळ्यावर मात करत तसेच पोलीस ठाणे व सरकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करून मोठ्या परिश्रमाने जलकुंभाचे काम पूर्ण करून गावाचा पाणी प्रश्न सोडवला. त्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले त्यामुळेच मी गावाचा पाणीप्रश्न सोडवू शकले. असे प्रतिपादन वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण यांनी जलकुंभाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.

वाळूज येथील लोकसंख्या सुमारे 40 हजाराच्या आसपास आहे. येथे सहा वार्डातून सतरा सदस्य ग्रामपंचायतचे प्रतिनिधित्व करतात. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी विंधन विहीर व एमआयडीसी कडून पाणी मिळते. मात्र हे पाणी साठवण्यासाठी जलकुंभ नसल्याने नव्या जलकुंभाचे भूमिपूजन 12 ऑगस्ट 2022 रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी जलकुंभाच्या जागेवरून पोलीस प्रशासन आणि

ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात वाकयुद्ध भडकल्याने गावाचा पाणी प्रश्न चांगलाच तापला होता. मात्र त्यानंतर जलकुंभाच्या जागेचा प्रश्न, जलकुंभासाठी लागणाऱ्या निधीचा प्रश्न, पदाधिकाऱ्यांमधील बेपनाव, राजकीय श्रेयवाद. अशा अनेक प्रश्नांवर मात करत अंदाजे 1 कोटीच्या निधीतून 7 लाख लिटर क्षमतेच्या रखडलेल्या जलकुंभाचे काम ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पूर्णत्वास नेले.

अखेर भूमिपूजनानंतर तीन वर्षाने वाळूज येथील बहुप्रतिक्षित जलकुंभाचा लोकार्पण सोहळा सोमवारी 20 ऑक्टोंबर रोजी सरपंच सईदाबी पठाण यांच्या हस्ते झाला. यावेळी विस्तार अधिकारी अशोक घोडके, ग्रामपंचायत अधिकारी उत्तम भोंडवे, गंगापूर बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे, उपसरपंच योगेश आरगडे,

पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, माजी सरपंच पपीन माने, सर्जेराव भोंड, रिटायर पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापे पाटील, ग्रामपंचायत सदस्या विमलबाई चापे, ग्रामपंचायत सदस्य शेख जमील अहमद, फिरोज पठाण, नदीम झुंबरवाला, दयानंद साबळे, तौफिक शेख, प्रा. डॉ. रमेश हातोडे, योगेश नाडे, नासेर पटेल, शिवाजी गायकवाड, शेख अख्तर, रवी मनगटे, नामदेव ईले, संतोष आरगडे, वरिष्ठ लिपिक ताजू मुल्ला, रोहित श्रीमाळी, अमोल बनकर, पाणी पुरवठ्याचे शेख असलम, राजाराम जमधडे, अंकुश वाकचौरे, शिवाजी मिसाळ, शेख अख्तर, पांडू आगळे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.


आठवड्यातून दोन दिवस मिळणार पाणी –
गावाला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी साठवण क्षमतेचा जलकुंभ नसल्याने वाळूजकरांना 10 ते 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत होता. कधी कधी तर तो 20 ते 25 दिवसावर जायचा. मात्र नव्या 7 लाख लिटरच्या जलकुंभामुळे हा पाणीपुरवठा आता आठवड्यातून दोनदा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाणी प्रश्नसंदर्भात नागरिकांच्या अशा पल्लवीत झाले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *