
वाळुज महानगर – वाळुज परिसरातील आदर्श पाटोदा गावात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री, यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) आणि त्यांच्या पथकाचा नुकताच अभ्यास दौरा झाला.
या दौऱ्यादरम्यान के. विष्णुवर्धन रेड्डी (OSD), उपमुख्यमंत्री कर्नाटक” यांनी पाटोदा गावातील घनकचरा व्यवस्थापन प्रणाली कार्यप्रणाली आणि ग्रामपंचायतच्या सुका कचरा MRF केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीमध्ये येणाऱ्या दूषित पाण्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. विजय सपकाळ यांनी सांगितले की, गावातील सुका कचरा MRF केंद्रात पाठवला जातो, तर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून नदीकाठी वृक्ष लागवडीसाठी वापरले जातो. यावेळी पथकाने पाटोदा गावाच्या नदीजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळाला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक प्रश्न विचारण्यात आले. शाळेच्या बाजूला असलेल्या खाम नदीबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले. तसेच याबद्दल आपल्याकडून काय उपाययोजना केली गेली पाहिजे याबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांना विचारण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने पाटोदा गावामध्ये गावातील नागरिकांनी दिलेल्या टॅक्स (कर) च्या माध्यमातून गावामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल व ग्रामपंचायतला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतच्या विविध विकासकामांचा संपूर्ण माहिती उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी अधिकाऱ्यांना सविस्तर दिली. दौऱ्यावेळी सरपंच जयश्री दिवेकर, ग्रामपंचायत अधिकारी एस एल वावरे, इकोसत्वचे विजय सपकाळ, प्रकाश बकाल, शिवाजी दामोदरे, सचिन भिसे, सखाहरी पेरे, रवी जाधव उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्याद्वारे कर्नाटक राज्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी पाटोदा ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांचे कौतुक केले आणि गावातील स्वच्छता, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, वीज आणि सार्वजनिक सहभाग या सर्व बाबींमध्ये योग्य पद्धतीने काम सुरू असल्याचे कौतुक केले.
दौऱ्यामध्ये यांचा होता समावेश –
या दौऱ्यामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री के. विष्णुवर्धन रेड्डी, उपमुख्यमंत्र्याचे तांत्रिक सल्लागार के. जयप्रकाश, सहाय्यक अभियंता हिना कौसर, व्यवस्थापकीय संचालक महेशा, रस्ते, वीज, पाणी व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता भावन प्रसाद, तांत्रिक सहाय्यक एम. तुलसीदेवी, जलसंपदा विभागचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोहर व्ही. रोट्टे, तांत्रिक सल्लागार गंगा पी. मेनन, वरिष्ठ पर्यावरण अधिकारी एम.अनिल कुमार यांचा समावेश होता.
