वाळूजमहानगर (ता.21) – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श पाटोदा गावातून जाणार्या वाळूज ते बिडकीन या रस्त्याच्या कामास एमआयडीसीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता पूर्ण होऊन वाळूज व बिडकीन या दोन्ही औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहे. परिणामी येथील उद्योग, धंदे भरभराटीस येणार आहे.
पाटोदाचे शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांच्या पुढाकाराने पाटोदा येथे अनेक शासकीय योजनेचा लाभ घेत विविध उपक्रम राबवले. त्यामुळे पाटोदा या आदर्श गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तेव्हापासून गावाचे नाव लौकिक झाले असून हे गाव पाहण्यासाठी येथे नेहमी मंत्रीगण, शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांचे पथक व इतर मान्यवर भेटी देत असतात. या भेटीतून घेतलेला आदर्शाचे अनुकरण ते आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी किंबहुना जिल्ह्यासाठी करत असतात. म्हणूनच आज पाटोदा हे आदर्श गाव राज्य पातळीवर मोठ्या डौलाने, अभिमानाने गाजत आहे. पाटोदा हे गाव वाळूज व बिडकीन या दोन्ही औद्योगिक वसाहतीच्या मध्ये असलेले छोटेसे गाव आहे. गाव म्हटले की, रस्त्याची दुरावस्था असतेच. अशीच दुरावस्था या गावाच्या रस्त्याची झाली.
पेरे चौकापासून गेवराई तांड्यापर्यंत 7 किलोमीटरचा रस्ता या गावासाठी मुख्य आहे. त्यापैकी गेवराई तांड्यापासून दोन किलोमीटर रस्त्याचे काम झालेले आहे. मात्र पेरे चौकापर्यंतचे 5 किलोमीटर रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे ग्रामपंचायतने या रस्त्याच्या कामासाठी एमआयडीसीकडे गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा केला. आणि या पाठपुराव्याची दखल घेत एमआयडीसीने हा रस्ता मंजूर केला. त्याचे पत्रही पाटोदा ग्रामपंचायतला नुकतेच मिळाले आहे. दहा मीटर रुंद असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी अंदाजे 16 कोटी रुपये खर्च होणार आहे.
