
वाळूजमहानगर, (ता.24) – रस्त्यात थांबलेल्या ट्रक मध्ये धारदार तलवार आढळल्याने पोलिसांनी ती जप्त करून आरोपी परप्रांतीय ट्रक चालकास अटक केली आहे. प्रकार बुधवारी (ता.24) रोजी दुपारी सोलापूर धुळे हायवे वरील एचपी पंपाजवळ घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळशीराम खंडु हुमे (27) रा. लासुरगाव ता. गंगापुर (ह.मु. साजापुर) ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी फोन करून सांगितले की, साजापुर फाटा एच. पी. पेट्रोलपंप जवळ रात्रीचा अपघात झाला ती ट्रक उभी असुन त्यात तलवार आहे. तेथे ट्रक चालक आणि कंपनीचे लोक आहेत. त्यासाठी पोलीस मदत हवी आहे. या माहितीवरून पोलिसांनी तेथे धाव घेऊन अशोक लेलंड ट्रक (एच आर 67, डी-3264) चा चालक सचिनकुमार श्रीरामभजन (26) रा. कर्बक ता.अकबरपुर जि. कानपुर ( उत्तर प्रदेश) याला विचारपूस करून ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये सिट पाठीमागे एक तलवार मिळुन आली. 1200 रुपये किमतीची तलवार मिळून आली. सोनेरी रंगाची मुठ, त्यावर सिरोही की तलवार, 30 साल की गारंटी असे लिहिलेले आहे. धारदार पाते, लांबी 2 फुट 3.5 इंच असे तीचे वर्णन आहे. पोलिसांनी जप्त करून चालकास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार युसुफ इब्राहिम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
