
वाळुज महानगर, (ता.15) – उत्पत्ती एकादशी हरीदिनी निमित्त वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वेळी दिवसभरातून दहा ते पंधरा हजार भाविकांनी हरिनामाचा गजर करत मोठ्या भक्तीभावाने शांततेत दर्शन घेतले. दरम्यान दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वारकरी संप्रदायमध्ये आषाढी कार्तिकी एकादशीला मोठे महत्त्व आहे. म्हणूनच मोठ्या पंढरपूराप्रमाणे वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात आषाढी, कार्तिकी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते. आषाढ आणि कार्तिक महिन्यात प्रत्येकी दोन एकादशी येतात. कार्तिक महिन्यातील शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी होती. या निमित्त पंढरपूर येथे भाविकांनी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त मंदिर संस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने प्रथम पहाटे 5:30 वाजता पंढरपूर येथील व्यापारी ठाकूर परिवाराच्या वतीने विठ्ठल रखुमाई मूर्तीला
मुकेशशेठ प्रकाशशेठ ठाकुर यांच्या हस्ते सपत्नीक
महाभिषेक करून पूजा करण्यात आली.

त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजे दरम्यान श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था पैठण येथील रामायणाचार्य ह. भ. प. प्रल्हाद महाराज महालकर यांचे कीर्तन होऊन दुपारी फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सायंकाळी 5:30 वाजता सामूहिक हरिपाठ व रात्री 9 वाजता सामुदायिक हरी जागरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गुणिजन गायक, वादक, महाराज मंडळी, भाविक भक्तगण व पंढरपूर, वळदगाव व पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती होती. 
शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी दिवसभरातून दहा ते पंधरा हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, आप्पासाहेब झळके, हरीश साबळे, बंकटलाल जयस्वाल, हरिभाऊ शेळके, शहादेव फुंदे, अभिमन्यू ढाकणे, अंकुश बारगळ, नारायण चव्हाण, अशोक देशमुख, काकासाहेब फांदाडे, गौतम चोपडा आदींनी परिश्रम घेतले.
