वाळूज महानगर, (ता.5) – न्यू शहीद भगतसिंह विद्यालय येथे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष अक्षय हरकळ, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख, प्राचार्य सोनवणे, वाहेद पठाण, बाळू खोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी शासनामार्फत आयोजित एक दिवस एक तास स्वच्छतेसाठी या स्वच्छता अभियानात शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. यावेळी शाळा आणि शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले. तद्नंतर विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगतातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महात्मा गांधी यांचे लिखित रघुपती राघव राजाराम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
उत्कर्ष आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.