वाळुज महानगर, (ता.9) – नंग्या तलवारी हातात घेवुन बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात दुचाकीवर फेरफटका मारत दहशत माजविणारे व तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न करणा-या तीन्ही आरोपीतांना वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी 9 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास खवड्या डोंगर येथे मुसक्या आवळल्या.

याबाबत माहिती अशी की, पैश्याच्या जुन्या भांडणावरुन मधुकर रामा भालेराव, वय 35 वर्ष, रा. एसटी क़लनी, बजाजनगर याला धडा शिकवण्याच्या तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गुरुवारी 8 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तीन आरोपींनी बजाजनगर परीसरात तसेच महाराणा प्रताप चौकात हातात तलवार व लाकडी दांडे घेऊन दुचाकीवर ट्रिपल सीट फेरफटका मारून गर्दीच्या ठिकाणी मधुकर भालेराव याला ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार फिरवुन त्याच्या पाठीवर वार करुन जखमी केले. प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
या गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा करुन बजाजनगर परीसरात नंगी तलवार घेवुन बराच वेळ फिरले व परीसरात त्यांनी दहशत पसरवली. आणि रात्री खवड्या डोंगरावर जावुन मुक्काम केला. तसेच सकाळी फिर्यादीच्या घरासमोर जावुन त्यास परत खुन्नस देवुन मनमाड येथे पळुन गेले. व त्यांना पोलीस पकडु नये म्हणुन मोबाईल स्वीच ऑफ केले. 
फरार झालेले तीन्ही आरोपी हे सायंकाळी खवड्या डोंगर परीसरात येणार असल्याची माहिती शुक्रवारी 9 जानेवारी रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध मिळाल्याने पोलिसांनी परीसरात सापळा लावला असता सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास तीन जण पायी खवड्या डोंगराकडे येतांना दिसले. त्यांना पकडण्यासाठी पोलीस धावले असता ते खवड्या डोंगर परीसरात वेगवेगळ्या दिशेने पळाले. 
मात्र पोलिसांनी त्यांचा दीड किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ऋषीकेश उर्फ मारी शालीक सोनवणे, वय 19 वर्षे, प्रकाश रमेश गायकवाड, वय 25 वर्षे व अभीजीत किशोर फाटे, वय 22 वर्षे, सर्व रा. वडगाव (कोल्हाटी) ता. जि. छत्रपती संभाजीनगर अशी त्यांची नावे व ठिकाण आहेत.

यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त, पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोउपनि. सागर पाटील, प्रविण पाथरकर, पोलीस हवालदार अरुण उगले, अविनाश ढगे, राजाराम वाघ, सुरेश भिसे, पोलीस अंमलदार नितीन ईनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, संदीप तागड, रोहीत चिंचाळे, शिवनारायण नागरे यांनी केली.
