
वाळूज महानगर, (ता.15) – कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या तुमच्या मनाला मजबूत ठेवा. प्रॉब्लेम कसाही असू द्या तुम्ही जर मनात ठेवले तर कुठल्याही गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. मनाने ठरवले तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही. जीवन संघर्षमय आहे आणि यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. मेहनतीच्या जोरावरच आपण यशस्वी होऊ शकतो. ध्येयप्राप्ती साठी प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. असे प्रतिपादन उद्योजक तथा न्यू सरस्वती शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी बजाजनगर येथे केले.
स्व. भैरोमल तनवानी विद्यालयात आयोजित पालक मेळाव्याच्या कार्यकमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पालकांना विद्यार्थ्यांसोबतही काही वेळ घालवला पाहिजे. महिन्यातून एकदा शाळेत येऊन शिक्षकांना भेटले पाहिजे. असा सल्ला दिला. यावेळी पर्यवेक्षक अशोक मुटकुळे, रोहण आंबेकर, मेघा इटणकर, शारदा पगारे, पालक प्रतिनिधी प्रदीप गाढवे व शिक्षक, पालक यांची उपस्थिती होती.
