
वाळूजमहानगर, (ता.16) – प्रसूती वेदना होत असल्याने ऐनवेळी सरकारी रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र दवाखान्यात जाण्यापूर्वीच धावत्या रुग्णवाहिकेतच पहिला प्रसूत झाली. डॉक्टर व पायलट यांनी वेळीच मदत केल्याने सुदैवाने नवजात बाळासह माता ठणठणीत असल्याचे पाहून नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला. वाळूज परिसरात घडलेली ही घटना मंगळवारी (ता.16) रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास रांजणगाव येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 108 या सरकारी रुग्णवाहिकेचे पायलट मंगलसिंग राठोड यांना कॉल आला की, वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे एका महिलेस प्रसूती वेदना होत आहे. त्यामुळे त्यानी रांजणगाव येथे धाव घेत कमळापूर फाट्यावरून या महिलेस घेतले. रुग्णवाहिका काही अंतरावर जाताच या महिलेला कळा सुरू झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पायलट मंगलसिंग राठोड यांनी रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उभी केली. वेळीच डॉ. सुशील राऊत यांनी योग्य ती काळजी घेतल्याने ती महिला रुग्णवाहिकेतच प्रस्तुत झाली. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे पहाटे 5 वाजता
घटना घडली. क्रांती जंजिरे वय 20 वर्ष रा. नांदेड (हल्ली मुक्काम रांजणगाव) या महिलेचे नाव आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून प्रसूतीनंतर माता व बाळ ठणठणीत असल्याचे पाहून नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला. प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी महिला व बाळाला घाटी रुग्णालयात दाखल केले. यात रुग्णवाहिकेचे पायलट मंगलसिंग राठोड व विलास भालेराव यानी सहकार्य केले.
