वाळूजमहानगर, (ता.17) -विद्युत डिपी जळाल्यामुळे रांजणगाव (शेणपुंजी) येथील सावतानगर या भागातील नागरिक दोन दिवसापासून अंधारात असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मात्र डिपीची दूरुस्ती करण्यास
महावितरणकडून टाळाटाळ केली जात असल्याने नागरिक व व्यवसायिक यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
रांजणगावातील शहीद भगतसिंह शाळेसमोरील विद्युत डिपी सोमवारी (ता.15) रात्री जळाली. त्यामुळे सावतानगर व परिसर दोन दिवसापासून अंधारात आहेत. विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर उकाडा व डासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी विज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचा-याकडे तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर महावितरणच्या कर्मचा-यांनी येऊन विद्युत डिपीची पाहणी केली. मात्र ती दुरुस्त केली नाही. त्यामुळे नागरिकांना अख्खी रात्र उकाडा व डासाचा त्रास सहन करीत जागरण करावे लागले. महावितरणकडून विज बिलाची सक्तीने वसुली केली जात असून विज पुरवठा दोन-दोन दिवस बंद केला जात असल्याने ग्राहकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे आठवडाभरापुर्वीच या विद्युत डिपीची दूरुस्ती करण्यात आली होती. ती पुन्हा जळाली आहे. या भागात विज ग्राहकांची संख्या मोठी असून विजेचा भार जास्त असल्याने डिपी वारंवार नादूरुस्त होते. या परिसरात सुरळीत विज पुरवठा व्हावा, यासाठी 63 के.व्ही.क्षमतेऐवजी 200 के.व्ही.क्षमतेची डिपी बसवून या भागातील विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी. पंचायत समिती सदस्य दीपक बडे, विठ्ठल गोरे, राजकुमार कुबेर, गजानन रावळकर, शुभम कराड, गणेश काथार, बंटी गायकवाड, चॉंद शेख, रामनाथ भराड, राजु लहाणे, किरण धिरडे आदींनी केली आहे.
