वाळूजमहानगर, ता.25 – एका ट्रक मधून दुसऱ्या ट्रक मध्ये माल भरत असताना दोन्ही ट्रकच्या मध्ये दबल्याने 48 वर्षीय ट्रक चालक गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात शनिवारी (ता.23) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पंढरपूर जवळ झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवरील पंढरपूरजवळ असलेल्या अब्बास ट्रान्सपोर्ट समोर माल ट्रान्सफर करण्यासाठी दोन ट्रक पाठीमागील बाजूला जोडत होते. त्याचवेळी ट्रक चालक जनार्धन हरिभाऊ साबळे (वय 48) रा गेवराई पायटा ता फुलबी.जि. छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही ट्रक मध्ये दबले. शनिवारी (ता.23) रोजी रात्री 7.15 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात जनार्दन साबळे हे गंभीर जखमी होऊन बेशुध्द झाले. त्यांना परसराम सोनवणे व रवि काटे यांनी घाटी दवाखाना छञपती संभाजीनगर येथे आणुन दाखल केले असता रोजी 7.50 वाजता तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीचे एस. डी सोनवणे यांच्या कबड्डीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एकनाथ गिरी हे करत आहे.
