
वाळूजमहानगर, ता.12 (बातमीदार) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात इंडिका कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन महिलांसह तीन जण जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील 20 नंबर खोली जवळ शुक्रवारी (ता.12) दुपारी झाला. 
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरू धानोरा येथील भागचंद लक्ष्मण चव्हाण (वय 42), गायत्री संदीप चव्हाण (वय 23) आणि सुनिता भागचंद चव्हाण (वय 38) हे सर्व दुचाकी (एम एच 20, सीएन – 1988) वरून गुरु धानोऱ्याहून तुर्काबाद (खराडी) येथे लग्नाला जात होते. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील 20 नंबर खोलीजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात इंडिका कारने जोरात धडक देऊन पसार झाला. शुक्रवारी (ता.12) रोजी दुपारी झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या विनामूल्य अंबुलन्सचे चालक संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघात ठिकाणी हजर होऊन अपघात ग्रस्तांना जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले. या प्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
