
वाळूज महानगर, (ता.28) – भरधाव जाणारा कंटेनर आणि दुचाकी यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात शनिवारी 28 मार्च रोजी सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास इसारवाडी फाटा ते शेंदुरवादा रोडवरील मुक्तेश्वर शुगर मिलजवळ झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कृष्णा दत्तात्रय म्हस्के वय 14 वर्ष रा. मुर्शिदाबाद ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा शनिवारी 28 मार्च रोजी दुचाकी (एम एच 20, एफ डी,- 6688) वरून जात असताना त्याची दुचाकी व कंटेनर (आर जे 19, जी के- 3585) यांच्यात जोराची धडक झाली. सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास इसारवाडी फाटा ते शेंदूरवादा रोडवरील मुक्तेश्वर शुगर मिलजवळ झालेल्या या अपघातात कृष्णा म्हस्के हा गंभीर जखमी झाला.

त्यास अशोक विधाते व सुभाष पाठे यांनी उपचारार्थ घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी कृष्णा यास तपासून 11:05 वाजता मयत घोषित केले.

याप्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कारभारी देवरे करीत आहे.
