
वाळूजमहानगर (ता.23) – पाठीमागून भरधाव आलेल्या युनिकॉन दुचाकीवरील दोघांनी समोरील दुचाकीला धडक देत पाठीमागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला. ही घटना बजाजनगर येथे मंगळवारी ता.21) रोजी भरदुपारी घडली. मंगळसूत्र हिस्कावण्याच्या सतत वाढणाऱ्या या घटनांमुळे बजाजनगर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील सेवानिवृत्त अधिकारी रंजीव राजन कल्याणकर वय 59 व त्यांची पत्नी सुनीता हे दोघे स्कुटी (एमएच 13, सीपी- 2605) वरून मंगळवारी (ता.21) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौकाकडून म्हाडा कॉलनी बजाजनगर येथे जात होते. ते आम्रपाली बुद्ध विहाराजवळील न्यू क्रांती चौकात येताच युनिकॉन दुचाकीवर भरधाव आलेल्या दोघांनी कल्याणकर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत सुनीता कल्याणकर यांच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिस्कावले. त्याचवेळी कल्याणकर पती-पत्नी स्कुटी वरून खाली पडून जखमी झाले. त्यामुळे रंजन कल्याणकर यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत भामटे पसार झाले होते. मंगळवारी (ता.21 )रोजी भर दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अज्ञात चोरट्यांनी अंदाजे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिस्कावून नेले. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळसूत्र चोरीच्या घटनेत वाढ, महिलांमध्ये नाराजी-
बजाजनगर या कामगार वसाहतीसह वाळूज औद्योगिक परिसरात चोऱ्यांसह लुटमार व हाणामारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः बजाजनगर येथे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिस्कावण्याचे प्रकार दिवसाढवळ्या होत आहे. त्यामुळे येथील महिलांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन चोरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे.
